परीक्षा

एक दिवस शाळेसाठी,
मी खोटं बोललो,
आजारी आहे बोलून,
मी घरीच राहिलो.

आजारी पडणे तर नुसतं,
निमित्त होतं,
अभ्यास पूर्ण झाला नाही,
हे खरं कारण होतं.

आज नाही तर उद्या,
हे पूर्ण करायचं आहे,
हेच तर माझा,
दुर्भाग्य आहे.

हे पूर्ण करता करता,
परीक्षा जवळ येईल,
माझे खेळणं आता,
अपुरेच राहील.

परीक्षा एकदा आली की,
हे करू नको ते करू नको चालू होतं,
अभ्यास च कर, हे एकच वाक्य,
सतत कानावर पडतं.

शेवटच्या पेपर ची
एक मज्जाच वेगळी असते,
कधी संपवून एकदाचा खेळायला मिळेल
हीच इच्छा मनात धावत असते.

ही इच्छा फार दिवस,
काय राहत नाही,
निकालाचा दिवस जसं जवळ येतो,
तसं मन कशात लागत नाही.

निकाल लागून झाला तर,
कसली एवढी मोकळी मिळते,
पुन्हा नवा अभ्यास सुरू होतो,
पुन्हा नवी परीक्षा येते.

तेव्हा वाटत होतं,
हे दिवस लवकर संपवावे,
तेव्हा माहित कुठे होतं,
हेच दिवस आहेत आनंदाचे.

तेव्हा समजण्या इतका मोठा नव्हतो,
आता न समजण्या इतका लहान ही नाही,
परीक्षा ही शालेय जीवनातच काय तर,
आयुष्यभर देत राहण्यात काही गत्यंतर नाही.

Leave a comment